अमृतसर हावडा मेल एक्सप्रेसमधील घटना
कोलकाता (वृत्तसंस्था ) : हावड़ा येथून अमृतसर कडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 13006 अमृतसर हावडा मेल एक्सप्रेसच्या जनरल डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या टाकल्याने सुमारे 20 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सात प्रवाशांना शाहजहापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. अलिकडे ट्रेनचे अपघात वाढल्याने प्रवाशांना वाटले खरीच आग लागली आहे. त्यामुळे प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या टाकल्याचे उघडकीस आले आहे.
रविवारी सकाळी सुमारे 8:00 वाजताच्या दरम्यान बरेली आणि मीरानपुर कटरा स्टेशन दरम्यान अमृतसर हावडा मेलच्या जनरल कोचमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने चालकाने ट्रेनला ब्रेक लावले, तेव्हा अर्धी ट्रेन नदीच्या पुलावर आणि अर्धी ट्रेन पुलाच्या बाहेर उभी होती. ट्रेन थांबताच लोकांनी घाबरुन कोणताही विचार न करता बोगीतून पटापट उड्या टाकल्या. त्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले.
या घटनेत अनेक प्रवासी केवळ घाईगडबडीत उडी टाकल्याने जखमी झाले आहेत. बोगी रिकामी झाल्यानंतर ट्रेनच्या डब्याची तपासणी केली गेली. तेव्हा कुठेही काही जळल्याचे पुरावे सापडले नाहीत. पाच एम्ब्युलन्सना बोलावून जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे ट्रेन अर्धा तास थांबली होती. तपासणी अंती कोणताही अनुचित प्रकार आढळला नाही. त्यामुळे ट्रेनला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
दरम्यान बिलपुरजवळ सकाळी काही टवाळखोर तरुणांनी ट्रेन नंबर 13006 च्या जनरल जीएस कोचमधील ठेवलेले अग्निशमन यंत्र चालवले. त्यामुळे गाड़ीला थांबविण्यात आले. डब्यात धुर पसरल्याने लोकांना वाटले ट्रेनला आग लागली, आणि प्रवाशांनी उड्या मारल्या. दरम्यान टवाळखोर प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.