छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था ) : महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नसून आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेवेळी राज ठाकरेंनी मराठा आरक्षणासह निवडणूक, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल भाष्य केले आहे.
यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले सोलापूरपासून दौऱ्याला सुरुवात केली. साडेतीन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आहेत. दिवाळीनंतर होतील असं चिन्ह आहे. असं आज तरी वाटतंय. त्यादृष्टीने माझा मराठवाड्यातील पहिला दौरा आज संभाजीनगरात पूर्ण होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून मराठवाड्यातील राजकारण आणि वातावरण पाहत होतो, ऐकत होतो. त्याची प्रचिती आली आहे.
पुढे ते म्हणाले ,सोलापूरच्या पत्रकार परिषदेत मी जे बोललो ते सर्वांनी पाहिलं ऐकलं आहे. पण त्यानंतर जाणीवपूर्वक बातम्या केल्या आहेत. त्या धक्कादायक होत्या. राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध, राज ठकारे विरुद्ध मराठा समाज… वाट्टेल त्या हेडलाईन केल्या. तुम्हाला आठवत असेल तर २००६ रोजी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आमची एकच भूमिका राहिली आहे, ती म्हणजे आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिक निकषावर द्या”.
त्या उपर राज्याला आरक्षणाची गरज नाही. कारण या राज्यात शिक्षणापासून, उद्योग आणि इतर गोष्टी उपलब्ध आहेत. नोकऱ्या आहेत. बाहेरच्या राज्यातील लोकांना या गोष्टी मिळतात. ते येऊन घेतात. त्याच गोष्टी आपल्या लोकांना दिल्या तर आरक्षणाची गरज उरणार नाही, असं म्हटलं होतं. असेही यावेळी राज ठाकरे म्हणाले.