अमळनेर (प्रतिनिधी) :- चोपडा कडून एरंडोलकडे जाणारे वाहन सावखेडा गावाजवळ राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने सापळा रचून त्यातून ५ लाख ७९ हजार ४८० रुपयांचा बनावट मद्यसाठा दि ६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वाहतूक करतांना जप्त करण्यात आला. यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक के. एन. गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तालुक्यातील सावखेडा शिवारात सापळा रचण्यात आला.
यावेळी वाहन क्रमांक एमएच ३० बीडी- ११०३ या वाहनातून देशी विदेशी बनावट दारूसाठा वाहतूक करतांना तपासणी केली असता बनावट दारूसाठा आढळला. सदर वाहनात एकूण २४० बाटल्या मिळून आल्या आहे. सदर अवैध बनावट मद्यसाठा व वाहन असा एकूण किंमत रुपये ५ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात वाहनासोबत शुभम सुधाकर पाटील (रा. अरुण नगर ता. चौपडा व कैलास देविदास वाघ रा. श्रीरामनगर, चौपडा) यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे.
हि कारवाई दुय्यम निरीक्षक बी. डी. बागले, जवान बी. एन. पाटील, जवान वाहन चालक एम. डी. पाटील यांनी सदरच्या कारवाईत सहकार्य केले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चाळीसगाव राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक के एन. गायकवाड हे करत आहेत. राज्य उत्पादन जळगाव अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.