जळगाव | दि. ०२ ऑगस्ट २०२४ | भरधाव डंपर आणि ओमनी कारचा शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना तालुक्यातील सुनसगाव येथे घडली असून अपघातामध्ये ५ जण जखमी झाले आहेत.
बोदवड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी खासगी ओमनी वाहनाने शुक्रवार जळगाव येथे कामानिमित्त येत होते. त्यावेळेला सूनसगाव येथे समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने ओमनी कार ला जबर धडक दिली. या भीषण अपघातामध्ये ओमनी कारमधील चार जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींनाशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या जखमींमध्ये विविध कार्यकारी सोसायटीचे गट सचिव सुभाष प्रभाकर बावस्कर (वय ५२), कारकून रामदास देवराम मोरे (वय ५०), सोसायटीचे सेल्समन प्रकाश निना सोनार (वय ४०) यांचेसह चालक कैलास पुंडलिक सुशीर (वय ५०) हे गंभीर जखमी झालेतर नीना कैलास सुशीर (वय ३१) या तरुणाला किरकोळ मार लागला आहे.
दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर काही पोलिसांनी रुग्णालयात येऊन जखमींची माहिती घेतली. दरम्यान या घटनेप्रकरणी, नशिराबाद पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.