पॅरिस (वृत्तसंस्था ) ;- इंग्लंडचा जलतरणपटू ॲडम पॅटीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.ॲडम पॅटीने पुरुषांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात रौप्य पदक जिंकले. पण, हे पदक जिंकल्यानंतर अवघ्या एका दिवसात तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. टीम ग्रेट ब्रिटनकडून मिळालेल्या माहितीनुसार, पदक जिंकल्यानंतर ॲडम पॅटीची तब्येत थोडीशी बिघडू लागली. त्याला घशात संसर्ग झाल्याचे जाणवले. रात्री उशिरा पॅटीची प्रकृती बिघडू लागली, तेव्हा त्याची कोरोना चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 29 वर्षीय ॲडम पॅटीने रौप्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. सलग 3 ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो आता एकमेव जलतरणपटू बनला आहे. टोकियो ऑलिम्पिकप्रमाणे फ्रान्सच्या आयोजकांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोरोनाबाबत कोणताही कठोर प्रोटोकॉल तयार केलेला नाही.