जळगाव | दि.२३ जुन २०२४ | परिवहन वाहनांचा योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी विलंब झाल्यास केंद्रिय मोटार वाहन नियमानुसार ५० रूपये प्रतिदिन शुल्काची तरतुद केली आहे. ऑटोरिक्षा चालकांसाठी दंडाची तरतूद आर्थिदृष्ट्या अन्यायकारक ठरत असून महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या रिक्षा भाड्याच्या दराप्रमाणे मिळणाऱ्या उत्पन्नातून सदर स्वयंरोजगारितांचा व त्यांच्या कुटुंबाचा उद्रनिर्वाह जेमतेम होत आहे.
दरम्यान ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रणित भाजपा ऑटो स्कूल व्हॅन वाहतूक आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी यांच्या नेतृत्वात शहरातील रिक्षा चालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच रिक्षा चालकांना पासिंगसाठी रोज ५०/रुपये अन्यायकारक दंड लावला जात आहे. या संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नारायण पाटील, वसंत शेटे, सुनील वाणी, पद्माकर पाटील, अमोल शेटे आदींसह भाजपा वाहतूक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.