जळगाव | दि.१८ जुन २०२४ | स्वयंसहाय्यता बचतगटाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांची अडवणूक करण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत. त्यास वाचा फोडण्यासह न्याय हक्क व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज मंगळवारी जळगाव तालुक्यातील शेकडो महिलांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयाला धडक दिली.
पावसाळा सुरू झाल्याने गाव खेड्यात शेतीच्या कामांना आता बऱ्यापैकी वेग आलेला आहे. कोणालाच थोडीही उसंत राहिलेली नाही. त्यानंतर देखील बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात कार्यरत शेकडो महिला आज गावागावातून जळगावमध्ये दाखल झाल्या होत्या. बचतगटाच्या माध्यमातून बचतीची सवय लागली तसेच बँकेचे व्यवहार समजायला लागले. याशिवाय महिलांची संघटन शक्ती कळाली. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ सुद्धा मिळाले. मात्र, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या उद्दीष्टानुसार बचतगटांची स्थापना केल्यानंतर देण्यात येणाऱ्या खेळत्या भांडवलापासून गेल्या तीन ते चार वर्षांपासून महिलांना वंचित ठेवले गेले आहे.
बचत गटांची स्थापना करताना प्रत्येक गटाला खेळते भांडवल व गुंतवणूक निधी बचतगट व ग्रामसंघाच्या पात्रतेनुसार मिळेल, असे शासनाकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात पात्रतेचे निकष पूर्ण करूनही बचतगटांना कोणतीच रक्कम अद्याप मिळालेली नाही. सदरची प्रलंबित रक्कम आम्हाला तातडीने द्या. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास आम्ही तयार आहोत, अशी मागणी महिलांकडून जळगाव येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या कार्यालयात भरला मेळावा..
तत्पूर्वी, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव येथील जिल्हा कार्यालयात बचतगटाच्या महिलांचा मेळावा घेण्यात आला. त्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी महिलांच्या अडचणी समजून घेतल्या. बचतगट संपर्क अभियानाचे तालुका समन्वयक संदीप ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगला पाटील, वाल्मीक पाटील, योगराज सपकाळे, हेमंत पाटील, दिलीप चव्हाण, विजय भोळे, धवल पाटील, गोकूळ चव्हाण, रोहिदास पाटील, चंद्रकांत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.