जळगाव | दि.०७ जुन २०२४ | ‘न भूतो न भविष्यती’ असे अभूतपूर्व शिवचरित्र साहित्य संमेलन जळगाव शहरात भरणार असून हि खरोखरच सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संपर्काचे प्रभावी साधन नसून देखील त्यांनी मोहीमा आखून, त्या यशस्वीपणे पार करत स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे भूतकाळातून शिकून भविष्य घडविण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. तरी आपण या संमेलनाची एक शिवप्रेमी म्हणून जबाबदारी घेऊन सहभागी व्हावे आणि नागरिकांना देखील सहभागी करून घ्यावे असे आवाहन गोदावरी फाऊंडेशन संचालिका तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी पाटील यांनी केले.
रयतेचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गुरूवारी नूतन मराठा महाविद्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक चे संचालक विरेंद्र भोईटे हे तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील ह्या उपस्थित होत्या. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल पी देशमुख, शिवजागर समितीचे संचालक परमानंद साठे, सचिव भारती साठे, इतिहास प्रबोधन संस्थेचे विश्वस्थ रवींद्र पाटील हे होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. या नंतर प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यांनतर इतिहास प्रबोधन संस्थेचे विश्वस्थ रवींद्र पाटील यांनी येत्या २६ ते २९ जून दरम्यान आयोजित भव्य शिवचरित्र साहित्य संमेलनाबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते शिवचरित्र साहित्य संमेलन संकेत स्थळाचे (वेबसाईट) उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी संमेलनाच्या माहिती परिपत्रकाचे प्रकाशन संस्थेचे संचालक विरेंद्र भोईटे यांच्या हस्ते करण्यात आले . ” हिंदवी स्वराज्य” ऍप द्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगभर प्रसारित झाले आहे. या ऍपद्वारे महाराजांच्या कार्यावर आधारित प्रश्न पत्रिका उपलब्ध आहे. शिव राज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने सदर प्रश्नावली अचूक सोडविणाऱ्या ६ विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात आले. “हिंदवी स्वराज्य” ऍप मध्ये प्रश्नावली सोडविणाऱ्याना ऑनलाईन प्रमाणपत्र उपलब्ध आहे.
या प्रसंगी उपप्राचार्य आर.बी.देशमुख, प्रा संजय पाटील, प्रा के टी पाटील, प्रा सुनील गरुड यांच्यासह प्राध्यापक वर्ग व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देशमुख यांनी तर आभार भारती साठे यांनी मानले.