जळगाव, दि.१३ – विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच बचतीची सवय लागावी यासाठी संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘श्री संत ज्ञानेश्वर विद्यार्थी बचत बँक’ हा उपक्रम संचालिका अर्चना नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त सुरु करण्यात आला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक, शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्यासह शिक्षक वृंद उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थी बँकेचे व्यवहार स्वतः करू लागले आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व पालक वर्गातून कौतुक केले जात आहे. शाळेतील शिक्षक शालेय विद्यार्थ्यांसाठी नेहमी विविध उपक्रम राबवत असतात. एक दिवस शाळेमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू असताना शिक्षकांना अनेक विद्यार्थ्यांचे दात किडलेले आढळून आले. दरम्यान या संदर्भात शिक्षकांनी माहिती घेतली असता विद्यार्थ्यांना शाळेत येताना आई-वडील पैसे सोबत देत असल्याचे आढळून आले. शाळेत सोबत आणलेल्या पैश्याचे मुलं चिप्स, कुरकुरे आणि चॉकलेट मोठ्या प्रमाणात खातात आणि याच्यातूनच त्यांच्या दातांना कीड लागली असल्याचं समोर आले.
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे दिले जातात. यामुळे विद्यार्थ्यांकडून याचा अनावश्यक खर्च होतो आणि याचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतात. ही गोष्ट लक्षात घेऊन शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांचा अनावश्यक खर्च कसा टाळता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत शाळेपासूनच बँकेचे व्यवहार देखील समजणे गरजेचे आहे. सोबतच त्यांना लहानपणा पासूनच पैशांची बचत करणं किती गरजेचे आहे हे लक्षात येणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी बचत बँक सुरू करण्याचे ठरवले.