जळगाव, दि.०७ – कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या कोरोना
योद्ध्यांना कोरोना महामारी नियंत्रणात आल्यानंतर सेवेतून कमी करून अन्याय करण्यात आला असल्याचा आरोप करत, कोरोना योद्ध्यांनी शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागणी साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळावा व त्यांना शासकीय सेवेत विनाअट कायम करावे या मागणी साठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी संविधान जागर समितीचे भारत ससाणे, हरिश्चंद्र सोनवणे, अमोल कोल्हे, निलेश बोरा यांनी कंत्राटी कोरोना योद्ध्यांना मार्गदर्शन केले. आंदोलनात दिलीप सपकाळे, वाल्मीक सपकाळे, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, महेंद्र केदार, विजय करंदीकर यांच्यासह अविनाश चौधरी, निखील पाटील, उमाकांत विसपुते, विशाल महाजन, अक्षय जगताप, विशाल महाजन, सतीश सोनवणे, मनोज पाटील, अमोल चौधरी, मधुकर शिरसाळे, दिपाली नाईक, ज्योत्स्ना सुरवाडे, पल्लवी गवई, शिवानी दाभाडे, ऐश्वर्या सपकाळे, भाग्यश्री चौधरी, अर्चना शिरनाथ, पुजा माळी, जयवंत मराठे आदी कंत्राटी कोविड कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.