जळगाव, दि.२६ – येथील पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या ३४ व्या नाशिक परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे पुरूष व महिला अशा दोन्ही गटात सर्वसाधारण विजेतेपद जळगाव पोलीस विभागाने पटकाविले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण व समारोप समारंभ पार पडला. ‘नेहमी बंदोबस्त व नागरिकांच्या संरक्षणात व्यस्त असलेला पोलीस आज मैदानावर ही मजबूत दिसला यांचा अभिमान वाटतो.’ असे गौरवोद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढले.
समारोप समारंभात आमदार किशोर पाटील, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, क्रीडा स्पर्धांमध्ये विजेतेपद न मिळावेल्या संघांनी खचून न जाता पुढील वेळेस विजेतेपद पटकाविण्याची जिद्द ठेवावी. या स्पर्धांमध्ये पुरूषांबरोबर महिला खेळाडूंनी ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. जळगावचे मल्ल विजय चौधरी यांनी देशपातळीवर पोलीस विभागांचा नावलौकिक केला आहे. असे असंख्य विजय चौधरी आपल्याला मधून तयार झाले पाहिजेत. आगामी काळात नाशिक परीक्षेत्राचे पोलीस संघ देशपातळीवर नावलौकिक करेल. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जळगाव संघास २० वर्षांनी विजेतेपद..
३४ व्या नाशिक परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर अशा ६ संघांनी सहभाग घेतला होता. २० नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झालेल्या या स्पर्धा पाच दिवस घेण्यात आल्या. यात ६८० पुरूष व ११५ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धांचे २०१५ नंतर पहिल्यांदाच यजमानपद जळगाव पोलीस संघाने भूषविले. जळगाव पुरूष व महिला संघाने २० वर्षांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते चषक स्वीकारला.
यावेळी वैयक्तीक प्रकारातील खेळातील विजेत्यांनाही बक्षिस वितरण करण्यात आले. बक्षिस वितरणापूर्वी सहभागी संघांनी मार्च पंथ संचलन केले. यावेळी उपस्थित मान्यवर व पोलीस अधिकारी यांच्यात रस्सीखेच स्पर्धा ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. महसूल व पोलीस अधिकारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पोलीस संघाने पटकावले.
याप्रसंगी नाशिक पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अहमदनगर अपर पोलीस स्वाती भोर, रमेश चोपडे उपस्थित होते. अहवाल वाचन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी केले. आभार अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी मानले.