भडगाव, दि.२६ – भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने दि.१५ नोव्हेंबर २०२३ ते दि.२६ जानेवारी २०२४ या कालावधीत “विकसित भारत संकल्प यात्रा” ही मोहिम राबविण्यात येणार असून मोहिमेच्या जळगाव जिल्ह्यात फिरणाऱ्या रथापैकी आज भडगाव येथील रथाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
विविध योजनांच्या माध्यमातून आपण आत्मनिर्भर होणार असून यातून देश आणि देशवासी विकसित होणार असल्याचा मनोदय घेऊन ही संकल्प यात्रा आपल्या दारापर्यंत येणार असल्याचा आनंद असल्याची भावना खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे. यावेळी पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे, भडगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, शहर अध्यक्ष बन्सीलाल परदेशी, गटविकास अधिकारी रमेश वाघ यांची उपस्थिती होती.
खासदार महोदयांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृतीसाठी हा रथ रवाना करण्यात आला. याप्रसंगी अमोल शिंदे यांनी प्रास्ताविक तर शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी यांनी आभार मानले. युवा मोर्चा शहराध्यक्ष विशाल चौधरी, सोशल मीडिया प्रमुख शुभम सुराणा, राहूल देशमुख, निखिल कासार, कुणाल पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.