जळगाव, दि.१९ – पुणे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अंतर्गत नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्ष वयोगट मुले व मुली शालेय राज्यस्तर सॉफ्टबॉल स्पर्धेत जळगाव संघाने अजिंक्यपद पटकावले. यातून जिल्ह्यातील सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
नागपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तर सॉफ्ट बॉल स्पर्धेत जळगाव येथील ब.गो. शानबाग विद्यालयाच्या संघाने नाशिक विभागाचे नेतृत्व करतांना अजिंक्यपद प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघात सृष्टी बागुल, जान्हवी पाटील, चैताली पाटील, योगेश वाघ, वेद पाटील व चिराग मांडोळे या खेळाडूंची बिकानेर (राजस्थान) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
हे सर्व खेळाडू जिल्हा क्रीडा संकुल येथील जिल्हा सॉफ्टबॉल प्रशिक्षण केंद्र येथे सराव करतात. या खेळाडूंचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी अभिनंदन केले आहे.