भुसावळ, दि. 05 – दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्र नवीन ६६० मेगा वॅट प्रकल्पात योग्यतेनुसार स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, तोपर्यंत सदर प्रकल्प बंद ठेवण्यात यावा अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
सदर प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यासाठी खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी प्रकल्पातील मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कंत्राटदरांची माहिती मागितली असता, असे निदर्शनास आले की सदर प्रकल्पात कंत्राटदारांनी पर राज्यातील साधारण १२०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले असून फक्त ४०० स्थानिकांना रोजगार उपलब्ध केला आहे. परंतु सदर प्रकल्पासाठी जमीन संपादित करतांना स्थानिकांना रोजगार उपलब्ध करू असे आश्वासन देण्यात आले होते.
दरम्यान प्रकल्प सुरु करण्याचा मुख्य उद्देश स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा हाच होता. असे असतांना सुद्धा स्थानिकांना रोजगारापासून डावलण्यात येत आहे, तरी जास्तीत जास्त स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. यासाठी मुख्य अभियंता यांना शेवटची चेतावणी देण्यात आली आहे. असे यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, पंचायत समिती सभापती वंदना उन्हाळे, यांच्यासह स्थानिक नगरसेवक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.