जळगाव, दि.२७ – शहरातील आव्हाणे रोडवर असलेल्या के.सी. पार्क कॉलनीत खंडणीसाठी वाळू व्यावसायिक शुभम माने यांच्या घरासमोर गुरूवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तरूणांच्या टोळक्याने हैदोस घालत हवेत गोळीबार केला. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, शहरातील आव्हाने रोडवर के.सी. पार्क परिसर आहे. या ठिकाणी शुभम माने हे वाळू व्यावसायिक राहतात दरम्यान गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर टोळक्याने धुडगूस घालत त्यांना खंडणीची मागणी केली.
वाळू व्यावसायिक शुभम माने यांना वरच्या मजल्यावरून तरुणांनी खाली बोलावले मात्र माने खाली न आल्याने टोळक्याने खालूनच एकदा गोळीबार केला. तरी सुद्धा प्रतिसाद न मिळाल्याने टोळक्यातील काही जणांनी दरवाजावर दगडफेक केली. याचवेळी टोळक्याने पुन्हा दोन ते तीन वेळा गोळीबार केला. व काही वेळाने त्या ठिकाणाहून टोळके पसार झाले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
यावेळी मयूर माने याने घटनेची माहिती देताना टोळीतील पाच सहा जणांचे नावे सांगत, टोळीत अन्य आठ-दहा जण असल्याचे त्याने सांगितले. फायरिंग झाली त्यावेळी शुभम माने हे घरी नव्हते. मात्र त्यांची आई, वडील, भाऊ मयूर माने व त्याचा मित्र हे घरात होते. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शहर पोलीस ठाण्यात प्राथमिक माहिती घेत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.