फराज अहमद | जामनेर, दि. १७ – तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून संशयीत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गोकुळ सुनील पारधी (रा. वाघारी ता. जामनेर) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. तर १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने १२ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गावातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी आणि मयत तरुणीच्या दरम्यान प्रेम संबंध होते. मात्र तरुणीचे लग्न संबंध निश्चित झाले होते पण मुलीचे वय पूर्ण झाल्यानंतर विवाह होणार होता. मात्र संशयित आरोपी गोपाळ याने तिला लग्न मोडायला सांगितले. नाही तर मी प्रेम संबंधांबद्दल माहिती सांगेल अशी धमकी दिली. तरुणीने आई-वडिलांची बदनामी नको म्हणून लग्न मोडले. मात्र संशयित आरोपी गोपाळ याने तरी देखील तुझे फोटो- व्हिडिओ व्हायरल करेल असे सांगून पैशांची मागणी करू लागला होता.
त्यामुळे संशयित तरुणाच्या वारंवार होणाऱ्या जाचास कंटाळून १२ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता तरुणीने आत्महत्या केली. त्यामुळे तिच्या पित्याने जामनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी संशयित गोपाळ पारधी याला अटक करून जामनेर न्यायालयात हजर केले. दरम्यान न्यायालयाने त्याला तिन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड करीत आहेत.