जळगाव, दि. १५ – सिव्हिल रुग्णालयाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रूपांतर झाल्या नंतर देखील येथे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलीये. दरम्यान सोमवारी यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रभारी डिन यांना निवेदन देण्यात आले.
रुग्णांना व रूग्णांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसून एका बेड वर २ रुग्ण दाखल केले जातात. तसेच बेड वर चादरी व गादी ही स्वच्छ नसते, रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठवित असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच रुग्णालयाकडून औषधी मिळणे अपेक्षित असताना रुग्णांना बाहेरून खाजगी मेडिकल वरून औषधी घ्यावी लागते, रुग्णालयात एम.आर. आय तपासणीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
रुग्णालयात प्रसूती झालेल्या लहान बाळाची अदलाबदली प्रकरणी तीन आठवड्याचा कालावधी उलटला असून अद्याप डी.एन.ए चाचणीचे रिपोर्ट आले नसल्याने कारवाई झाली नाही. असे प्रकार वारंवार होऊ नये यासाठी उपाय योजना करावी. या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. तसेच आठ दिवसाच्या आत निवेदनावरचा मागणी पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक शहर जिल्हाध्यक्ष रीकु चौधरी, सुनील माळी, राजू मोरे, किरण राजपूत, भगवान सोनवणे, अमोल कोल्हे, रफिक पटेल, चेतन पवार, पंकज तानपुरे, सचिन साळुंखे, आकाश हिरवाडे, हितेश जावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.