जळगाव, दि.०३ – श्रवणदोष असणाऱ्या रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चांगले उपचार मिळत आहेत. आर्थिक अडचण असणाऱ्या रुग्णांना आता महात्मा ज्योतिबा फुले योजनेचाही लाभ होत आहे. बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, मोबाइल फोनचा वाढता वापर यांमुळे कान, नाक आणि घसा यांच्या समस्या आपल्याला भेडसावत आहेत. त्यासाठी मोबाईल फोनचा वापर मर्यादित ठेवा, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागातर्फे शुक्रवार जागतिक श्रवण दिनानिमित्त विशेष उपक्रम घेण्यात आला. रुग्णालयातील महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमधून १० गरजू रुग्णांना श्रवणयंत्र मोफत वाटप करण्यात आले. त्यावेळी अधिष्ठाता डॉ. ठाकूर हे बोलत होते. प्रसंगी मंचावर उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत सुपे, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे अध्यक्ष डॉ. ज्योती बागुल, कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे उपस्थित होते.
अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर म्हणाले कि, रुग्णालयात कान, नाक, घसा रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळत असून ऑडिओमेट्री व बेरा सुविधाही उत्तम सुरु आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यात जाण्याचे त्रास वाचलेत. तसेच लहान-मोठ्या शस्त्रक्रियादेखील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याने गरीब, गरजू रुग्णांना दिलासा मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रसंगी डॉ. निशिकांत गडपायले, डॉ. विनोद पवार, डॉ. ललित राणे, डॉ. डॅनियल साजी, ऑडिओलॉजिस्ट मुनज्जा शेख आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन लिपिक चंद्रकांत ठाकूर यांनी तर आभार राजश्री वाघ यांनी मानले. गजानन भुशिंगे, राकेश सोनार, जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी, संदीप माळी, अभिषेक पाटील, तेजस वाघ, विकास ढाकणे आदींनी परिश्रम घेतले.