जळगाव, दि.३१- मुंबई येथील काला घोडा महोत्सव हा जगभरात प्रसिद्ध असून साहित्य, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य , इंस्टॉलेशन अशा विविध कलांनी समृद्ध असलेला हा महोत्सव आतंरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. मुंबई येथे होणाऱ्या या महोत्सवात फक्त भारतातूनच नव्हे तर जगभरातून प्रतिसाद मिळत असतो. या महोत्सवात परिवर्तन निर्मित ‘अमृता साहिर इमरोज’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे.
हे नाटक सध्या महाराष्ट्रभर गाजत असून राज्यातील अनेक प्रमुख शहरात नाटकाचे प्रयोग झाले आहेत. शंभू पाटील लिखीत या नाटकाचे दिग्दर्शन मंजुषा भिडे यांनी केले असून, निर्मिती प्रमुख नारायण बाविस्कर व हर्षल पाटील आहेत. तांत्रिक बाजू राहुल निंबाळकर व मंगेश कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. यात जयश्री पाटील, हर्षदा कोल्हटकर व शंभु पाटील यांच्या भुमिका आहेत.
भारतातील श्रेष्ठ पंजाबी लेखिका अमृता प्रितम यांच्या जिवनावर आधारित हे नाटक अनेक पातळीवर समकालीन अनेक गोष्टींचा शोध घेत. यामुळेच अनेकस्तरीय हे नाटक मराठी रंगभूमीवरचा हा आगळा वेगळा प्रयोग म्हणून नाट्यकर्मी या नाटकाकडे पहात आहेत.
आता हे नाटक हिंदुस्थानी भाषेत येत असून त्याचे भाषांतर रवी मिश्रा यांनी केले आहे. मुंबईत होणा-या काला घोडा महोत्सवात ६ फेब्रुवारी सोमवारी सकाळी ११ वाजता नरीमन पॉइंट इथल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथे होणार आहे. परिवर्तन निर्मित नाटकाच्या निमित्ताने जळगावच्या हौशी रंगभूमीवरील नाटकाची प्रथमच काला घोडा महोत्सवात निवड झाली असल्याने खान्देशच्या रंगभूमीचा हा सन्मान आहे अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.