जळगाव, दि.३० – नाशिक जिल्ह्यातील सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी ‘बीआरएम राईड’ यशस्वी केल्याबद्दल जळगाव वंजारी युवा संघटनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी प्रचंड मेहनतीने आणि संघर्षातून ही ‘बीआरएम सायकलिंग राईड’ पूर्ण केल्याचे सदस्यांनी सांगितले.
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य गणेश कुवर, संचालक अमित घुगे, किरण डोंगरे, सीमा अमित घुगे, मंगेश पाटील, महेश सुतार, सुवर्णा देशमुख, यामिनी नटाळ यांनी सायकलींग राईड पूर्ण केली आहे. सुमारे ४०० किलोमीटरची ही ‘बीआरएम सायकलींग राईड’ जळगाव येथून २४ जानेवारी रोजी सकाळी सुरू झाली होती. राईडचा मार्ग जळगाव, शेगाव, पारोळा, जळगाव असा होता.
राईड पूर्ण करण्यासाठी २० तासांचा वेळ दिलेला होता. दिलेल्या वेळेत ही सायकलींग राईड पूर्ण करण्यामध्ये सदस्य यशस्वी झाले. त्याबद्दल वंजारी युवा संघटनेच्या वतीने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी यावेळी त्यांचे अनुभव सांगितले. सायकलमुळे व्यायाम असून आरोग्याच्या दृष्टीने सायकल चालवल्यामुळे प्रचंड फायदा होतो. सायकल चालवण्यामुळे इंधनाची मोठी बचत होते. यामुळे देशाच्या पर्यावरण विकासामध्ये हातभार लावता येतो. तसेच सायकलिंगमुळे आर्थिकदृष्ट्या मोठी बचत करता येते, असेही सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले.
यावेळी वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक, उपाध्यक्ष नामदेव नाईक, सचिव महादू सोनवणे, अनिल घुगे, चंदुलाल सानप, रामेश्वर पाटील यांच्यासह वंजारी समाज बांधव उपस्थित होते.