जळगाव, दि.६ – कथक नृत्यातील बनारस घराण्याची परंपरेची सौरव आणि गौरव मिश्रा ह्यांनी कथक नृत्याची जुगलबंदीची जळगावकर रसिकांना अनुभूती दिली. तसेच अभिजात संगीताचा आणि पाश्चात्त्य संगीताचा संगम असलेल्या फ्युजन बँड ने स्वरांची रूजवात करीत रसिकांकडून कलावंतांनी दाद मिळवली.
बालगंधर्व संगीत महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी महापौर जयश्री महाजन, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन चे विश्वस्त डाॅ. सुभाष चौधरी, राजेश गाडगीळ, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. विवेकानंद कुलकर्णी, शरदचंद्र छापेकर, दिपक चांदोरकर, दीपीका चांदोरकर, भालचंद्र पाटील, अनदान देशमुख, स्नेहल पाटील उपस्थित होते. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते कलावंतांचा सन्मान करण्यात आला.
स्व.वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २१ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्यासह इतर संस्था आहेत.
महोत्सवाच्या प्रथम सत्रात कलावंत उमेश वारभुवन (परकिशन) आशय कुलकर्णी (तबला) रोहित कुलकर्णी (किबोर्ड) विनय रामदासन (गायन) अभिषेक भुरूक (ड्रम्स) आणि संदिप मिश्रा (सारंगी) या फ्युजन बँड चे सादरीकरण केले. मॅसिव अटॅक कलेक्टिव्ह या बँड ने सुरवातीला ताल तिनताल मध्ये तबला, ड्रम आणि पर्कशनवरती राग किरवाणीमध्ये सादरीकरण केले. त्यानंतर राग कौशी कानडा मधील एक तराणा ताल एकताल मध्ये गायन, सारंगी आणि की बोर्ड यांच्या बरोबरीने सादर झाला. तराणा नंतर पं. जसराज जी यांनी गाऊन प्रसिद्ध केलेला हवेली संगीत हा गायनाचा प्रकार या बँड मध्ये वेगळ्या प्रकारे सादर झाला. यानंतर राग हंसध्वनी मध्ये एक गाणं सर्वांनी मिळून प्रस्तुत केले. आणि मृगनयनी या पं जसराज जी यांनी गायलेल्या रचनेने या कार्यक्रमाचा शेवट झाला.
दमदार कथक नृत्याची मेजवानी..
बालगंधर्व संगीत महोत्सवात सुप्रसिद्ध सारंगी वादक पं भवानी प्रसाद मिश्रा ह्यांचे नातू व सुप्रसिद्ध सतार वादक पं अमरनाथ मिश्रा ह्यांचे पुत्र सौरव आणि गौरव मिश्रा ह्यांनी कथक नृत्याची प्रस्तुती केली. त्यांना तबल्यावर संगत दिल्ली येथील प्रख्यात तबला वादक उस्ताद अक्रम खान यांनी केली. गुरूवंदना चांदोरकर प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी सादर केली. सुप्रसिद्ध निवेदिका दिप्ती भागवत यांनी संचालन केले.