जळगाव, दि.०८ – कोविड प्रादुर्भावाने हलाखीचे जिवन जगत असलेल्या लोककलावंताना शासनाने कोविड पॅकेज च्या माध्यमातून अर्थ सहाय्य करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन या संदर्भात २०२१ मध्ये शासन निर्णय करण्यात आला. शासन निर्णय व प्रसिद्ध जाहिराती नुसार प्रत्येक जिल्ह्यातील एकल कलावंताना अर्ज सादर करण्यात यावे असे जाहीर केले. उपरोक्त जाहिराती नुसार दि.२२ ऑक्टोबर २०२२ ते २२ नोव्हेंबर २०२२ असा एक महिन्याचा कालावधी निर्धारित करण्यात आला होता.
या जाहिराती नुसार जिल्ह्यातील एकल कलावंतानी संबंधित तहसील कार्यालयात जाऊन संबधित तहसीलदारांना अर्ज स्वीकारण्याची विनंती केली. तथा शासनाकडून तसेच जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाकडून तहसिलदार यांना कुठलेच आदेश प्राप्त नसल्याने जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यापैकी पाचोरा तालुका वगळता जिल्हयाती १४ तालुक्यातील तहसील कार्यालयाने एकल कलावंतांचे अर्ज स्वीकारले नाही.
या विषयाच्या अनुषंगाने बुधवारी खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या वतीने प्रशासन विभागाचे तहसिलदार सुरेश थोरात यांनी निवेदन स्वीकारले. प्रसंगी विविध लोककला प्रकारात कार्यरत एकल लोककलावंतानी आपल्या व्यथा मांडल्या.
या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना कोविड अर्थ सहाय्य योजने पासून जिल्ह्यातील एकल कलावंत वंचित राहू नये. याकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ मिळावी. योजनेचा लाभ कलावंताना मिळावा या करिता कार्य प्रक्रिया जलद गतीने राबवावी. तसेच पुढील ८ दिवसाच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा सनदशीर मार्गाद्वारे कलावंतांचा आवाज शासना पर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील लोककलावंत एकदिवसीय धरणे आंदोलन करतील असा इशारा खान्देश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी दिला.
या प्रसंगी खान्देश लोककलावंत परिषदे चे यावल तालुका अध्यक्ष भिका धनगर, चाळीसगावचे अध्यक्ष लिलाधर कारभारी, जळगाव तालुका प्रमुख अवधुत दलाल, परिषदेचे दुर्गेश अंबेकर, सचिन महाजन, सुदर्शन पाटील उपस्थित होते.