जळगाव, दि.28 – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी गुरुवारी जाहिर करण्यात आली. यात काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची पुन्हा एकदा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. डॉ.उल्हास पाटील यांच्या निवडीमुळे जिल्हा काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आक्रमक चेहरा म्हणून आमदार नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सूत्रे सोपविण्यात आली. प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी जिल्हानिहाय दौरे करुन संघटनात्मक आढावा घेतला. गुरुवारी दि.२६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक झाली, या बैठकीत प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नूतन कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले, त्यास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने मंजूरी दिल्यानंतर हि कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे. यात १८ उपाध्यक्ष, ६५ सरचिटणीस आणि १०४ चिटणीस अशी जंबो कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.
जळगाव जिल्ह्याला प्रदेशावर मान
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीत जळगाव जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी निवडणूकांच्या दृष्टीने डॉ.उल्हास पाटील यांची नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.
काँग्रेसला पुन्हा गत वैभव मिळवून देणार – डॉ.उल्हास पाटील
जळगाव जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. आगामी निवडणूकामध्ये काँग्रेस पक्षाला अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्ता जोडो अभियान राबविण्यात येणार आहे. गाव तेथे काँग्रेस हि संकल्पना घेऊन काँग्रेसला पुन्हा गत वैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न राहिल अशी ग्वाही नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी दिली.