जळगांव, दि.१५ – निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आणि शिर्डी येथील साई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भव्य राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन होणार असल्याची माहिती निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे व महिला पर्यावरण सखी मंच राज्य उपाध्यक्ष मनिषा पाटील यांनी दिली.
ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णा हजारे यांचे मार्गदर्शनाखाली व शिर्डी येथील साई संस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्यावरण संमेलनात पर्यावरण संरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रदूषण निवारण, घनकचरा व प्लॅस्टिक निर्मूलन, निसर्गाचे रक्षण, वने रक्षण, जंगलातील वणवे रोखणे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अशा अनेक विषयांवर तज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत.
पर्यावरण संरक्षण बाबत ठराव घेतला जाणार असून शेतकरी कार्बन क्रेडिट शेतीच्या दृष्टीने या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. तसेच या तीन दिवसीय संमेलन काळात शिर्डी परिसरातील पर्यावरण अभ्यास सौर प्रकल्प, दूषित पाणी शुद्धीकरण व पुनर्वापर प्रकल्प पाहणी सह संस्थेच्या नैसर्गिक व पर्यावरण पूरक उपक्रमांची ओळख व प्रत्येक जिल्ह्यातील पर्यावरण उपक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे.
या संमेलनात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. नाव नोंदणीसाठी महिला पर्यावरण सखीमंच राज्य उपाध्यक्षा मनिषा पाटील मो. ९४२०६६२०९३, पर्यावरण सखी मंचच्या राज्याच्या कार्याध्यक्षा महानंदा पाटील मो. ८७८८०७४५१७ पर्यावरण सखी मंच जळगांव जिल्हाध्यक्षा नयना पाटील मो. ९४२३४ ७२३८४ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी केले आहे.