जळगाव, दि.३१ – केंद्रीय विद्यालयाच्या १९ वर्ष वयोगटाखालील मुलींच्या स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर रश्मी रविंद्र कमोद या खेळाडूंची निवड झाली आहे. पुणे येथील स्पोर्टस् कॉम्पलेक्स (डीआरडीओ) येथे दि. २२ ते २३ दरम्यान केंद्रीय विद्यालयाच्या बॅडमिंटन स्पर्धेची विभागीयस्तरावरील विजेत्यांची स्पर्धा झाली. यामध्ये रश्मी कमोद ने आपल्या आक्रमक खेळ दाखवित विजश्री खेचून आणला. या विजयानंतर केंद्रीय विद्यालयाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
केंद्रिय विद्यालयाच्या नाशिक क्लस्टर बॅडमिंटन स्पर्धा- २०२२ या स्पर्धेत १९ वर्षाआतील मुलींच्या गटात सिंगल प्रकारमध्ये निवड झाली होती. त्यात नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, जालना या जिल्हातील खेळाडूंपैकी रश्मी कमोद हिची पुणे विभागीय स्तरावर यशस्वी निवड झाली होती. १९ वर्ष वयोगटात विभागीय स्तरावर गोवा व महाराष्ट्र मिळून ६० च्यावर खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
दरम्यान राष्ट्रीयस्तरावर निवड झाल्याने पुढील वाटचालीसाठी प्राचार्य मॅथ्यू अब्राहम, क्रीडा शिक्षक पंकज वराडे, प्रशिक्षक किशोर सिंह, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन, समन्वयक अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी यांच्यासह तिची आई स्नेहल, वडील रविंद्र कमोद यांनी शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशाबद्दल बॅडमिंटन क्षेत्रातील मान्यवरांनी कौतूक केले.