जळगाव, (जिमाका) दि. 27 – भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या गौरवशाली अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे व क्षेत्रिय लोक संपर्क ब्युरो, जळगाव यांच्यावतीने जळगाव जिल्ह्यात 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान जागर यात्रा फिरणार आहे.
जळगाव जिल्ह्यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले. येणारे वर्षभर अमृत महोत्सवाचे निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन शासनस्तरावर करण्यात येणार आहे. कोविडचे संकट अजुन संपलेले नाही. त्यामुळे कोविडच्या सर्व नियमांचे पालन करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
त्याचबरोबर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या जागर यात्रेचा प्रारंभ करुन या जागर यात्रेस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
या जागर यात्रेत दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशिय संस्थेच्या कलापथकाव्दारे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर करण्यात येणार आहे. देशभक्ती, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व आत्मनिर्भर भारताचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा जिल्हाभरात फिरणार असून कोविडचे नियम पाळून स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीकांनी यात सहभागी व्हावे. असे आवाहन भारत सरकारच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा राज्य) यांच्यामार्फत प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.