जळगाव, (जिमाका) दि. 24 – शेती पिकांना पुरक म्हणून शेतावर वृक्ष लागवडीखालील क्षेत्र वाढविणे या मुख्य उद्देशाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत वनशेती उपअभियान 2021-22 राबविण्यात येत आहे. त्यानुसार बांधावरील लागवड, कमी घनतेची लागवड, जास्त घनतेची लागवड या बाबींसाठी योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.
वृक्ष लागवडीच्या उपक्रमांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या बाबींचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना चार वर्षासाठी वर्षनिहाय 40%, 20%, 20%, 20% याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. बांधावरील लागवड या बाबीसाठी जास्तीत जास्त रु. 70/- प्रति रोप खर्चाचे मर्यादेत रु. 35/- अनुदान चार वर्षात उपरोक्त प्रमाणात विभागून दिले जाईल. साग, बांबु, यासारख्या वनिकी पिकांबरोबर सिताफळ, चिंच, बोर, जांभुळ यासारख्या फळपिकांची देखील लागवड योजनेंतर्गत करता येणार आहे.
बांधावरील लागवडीप्रमाणेच आंतरपिक/पट्टा पध्दत/विरळ वृक्ष लागवड करुन शेतजमिनीवर कमी घनतेची तसेच पडीक जमीनीवरही लागवड करता येणार आहे. सलग लागवड/पट्टयामधील लागवड/केळी, पपई यासारख्या पिकांचे शेताचे बांधावर साग, बांबु इ. वारा प्रतिबंधक वृक्षांची जास्त घनतेची लागवड करता येणार आहे. तसेच योजनेत लागवडीसाठी प्रति लाभार्थी कमीत कमी व जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा राहणार नाही.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर व कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.