जामनेर, दि. ०९ – स्थानिक स्वराज्य संस्थेत असणाऱ्या मनपा, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांच्या मार्फत त्यांच्या उत्पन्नातून 8 टक्के निधि हा दिव्यांग लाभार्थी यांची यादी करुन दिला जातो. परंतु या वर्षी हा निधि 8 टक्क्यांवरुन 5 टक्के वाटप करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांनी आपली नाराजी व्यक्त करत निधि नेहमीप्रमाणे 8 टक्के देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे नगरपरिषद मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्याकडे करण्यात आली.
दरम्यान पालिकेचे मुख्याधिकारी यांनी बोलताना सांगितले की, अपंगांना दिला जाणारा निधी हा नगरपरिषद उत्पन्नातून दिला जातो. नगरपरिषद उत्पन्न व वाढलेली लाभार्थ्यांची संख्या पाहता या निधीत कपात करण्यात आली असली तरी नगरपरिषदेच्या उत्पन्नानुसार राहिलेला फरक हा मार्च अखेरीस प्रशासकीय अडचणी सोडवून कसा देता येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी रवींद्र झाल्टे, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदीप गायके यांनी सर्व दिव्यांग बांधवांना प्रशासकीय अडचणीची माहिती देऊन आपल्या हक्काचा निधी कायदेशीर मार्गाने कसा मिळवायचा याचा प्रयत्न केला जाईल. व तसे आश्वासन नगरपरिषद प्रशासनाकडून आपल्याला देण्यात आले असल्याचे सांगितले.
दिव्यांग बांधवांसाठी राज्याचे भावी मंत्री बच्चू कडू यांनी स्वतंत्र अपंग मंत्रालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच या मंत्रालयाचा कारभार मी सांभाळण्यास तयार आहे असेही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले. त्यामुळे दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवणे आता सोपे होणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदीप गायके यांनी सांगितले.