जळगाव, दि.१० – खानदेशच्या सांस्कृतिक क्षेत्रातील क्रियाशील संस्था म्हणून परिवर्तन ओळखली जाते. गेल्या काही वर्षंपासून परिवर्तनच्या नाटकांचे व सांगीतिक कार्यक्रमांचे महोत्सव राज्यभर होत असतात. पुणे, जळगाव, धुळे, जामनेर, कणकवली, कोल्हापूर नंतर आता मुंबईत ‘परिवर्तन कला महोत्सव’ दि.१३, १४ व १५ मे २०२२ असे तीन दिवस आयोजित होत आहे.
सुप्रसिद्ध रंगकर्मी अभिनेते संदिप मेहता, अभिनेत्री विणा जामकर, रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर, अभिजीत झुंझाराव यांनी या महोत्सवाचे आयोजन पु.ल. देशपाडे सभागृह, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे केले आहे. ‘परिवर्तन कला महोत्सव’ हा सुप्रसिद्ध नाट्यलेखक स्व.जयंत पवार यांच्या स्मृतींना समर्पीत करण्यात आला आहे. या तीन दिवसीय महोत्सवाची सुरवात बहिणाबाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित “अरे संसार संसार” सांगितीक कार्यक्रमाने होणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन यांची तर दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे आहे. या कला महोत्सवात “नली” एकलनाट्य, “अमृता साहिर इमरोज” हे नाटक सादर होणार आहे. तीन दिवस एकाच संस्थेची निर्मिती असलेले तीन उत्तम कार्यक्रम असलेला हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. परिवर्तन तर्फे सादर करण्यात आलेल्या ‘अरे संसार संसार’चे आतापर्यंत २६ प्रयोग, नलीचे ५४ व ‘अमृता साहीर इमरोज’चे ७ प्रयोग झाले आहेत. या महोत्सवास उपस्थितीचे आवाहन अभिनेते संदिप मेहता, अभिनेत्री विणा जामकर, रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर, अभिजीत झुंझारराव यांनी केले आहे.