गजानन पाटील | अमळनेर, दि. १६ – सद्यस्थितीत नोकरी असेल तर छोकरी नाहीतर नापसंती.. मात्र याला आजही अपवाद पाहायला मिळतो. नवतंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायात देखील भरघोस उत्पन्न घेता येते असे अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात.
दरम्यान अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील आदर्श शेतकरी योगेंद्रसिंग राजपूत यांच्या मुलाच्या विवाहाप्रसंगी चक्क नवरदेवाच्या गाडीलाच शेतकरी राजाच्या रथाचे प्रतीक असलेल्या बैलगाडीची प्रतिकृती व शेतकरी बॅनर लावीत सजविण्यात आले होते. ‘मी आधी शेतकरी, नंतर नवरदेव’.. असे म्हणत आपल्या होणाऱ्या पत्नी सोबत लग्न बंधनात अडकले.
योगेंद्रसिंग राजपूत यांचा एकुलता एक मुलगा भुपेंद्रसिंग राजपूत हा वडिलांचा शेती व्यवसाय जोपासत असून शेती व्यवसायाला प्रचंड महत्त्व देतो. दरम्यान नवरदेवाच्या गाडीला वेगवेगळे फिल्मी बॅनर पाहायला मिळतात. मात्र, कळमसरे येथील शेतकरी कुटुंब याला अपवाद ठरले आहे. आजच्या तरुणाईला यातून वेगळा संदेश मिळावा, या उद्देशाने नवरदेवासाठी सजविलेल्या मोटारीवर बैल गाडीची प्रतिकृतीच्या सजावटीचे सर्वानाच आकर्षण ठरले.
शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे असा संदेश भुपेंद्रसिंग यांच्या विवाहातून दिल्याने साहजिकच नवरदेवसाठी सजवलेली शेतकरी लूक गाडी पंचक्रोशीत सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती.