जळगाव दि.१२ – अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सांघिक बुध्दिबळ स्पर्धा प्रेसिडेंट कॉटेज सुरू आहेत. जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि.यांनी स्विकारले असुन ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे होत आहे.
सकाळच्या फेरी अखेर महिला गटात ८ गुणांसह विमानतळ प्राधिकरण चा संघ आघाडीवर तर पुरुष गटात विमानतळ प्राधिकरण व रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड ‘ ब ‘ संघ ९ गुणांसह संयुक्त रित्या आघाडीवर. सकाळी झालेल्या महिलांच्या ४ फेरीत पहिल्या पटावर विमानतळ प्राधिकरण च्या अर्पिता मुखर्जी व आर वैशाली ने अनुक्रमे आंध्रा राज्य संघाच्या निहारिका व कोटेपल्ली साई निरुपमा यांचा पराभव करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. तर दिव्या व प्रियांका यांनी सहजरीत्या बरोबरी स्वीकारत ३-१ ने संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या पटांवरील सामने कमालीचे एकतर्फी झाले पेट्रोलियम स्पोर्ट्स च्या सौम्या स्वामिनाथनने अंजली सागर यांच्या राजावर आपल्या मोहऱ्यांनी अचूक हल्ला चढवत राजाला जेरीस आणले, पांढऱ्या उंटाची एफ ७ प्यादाला मारण्याची युक्ती अंजली सागर यांना न उमगल्याने त्यांचा राजा विचित्र कोंडीत सापडला पण सौम्याच्या उंट व घोडा वजीराच्या समन्वयाचा अंदाज न आल्याने त्यांना शरणागती पत्करावी लागली. बाकी मानांकित खेळाडूंच्या सहज विजयामुळे पेट्रोलियम स्पोर्ट्सने गुजरात राज्य संघाचा ४-० असा पराभव करीत आपले आव्हान जिवंत ठेवले.
उद्या होणाऱ्या महिलांच्या पाचव्या फेरीत विमानतळ प्राधिकरण ओडिशा राज्य संघाबरोबर तर पेट्रोलियम संघ महाराष्ट्र अ संघांसोबत समोरासमोर भिडतील. पुरुष गटातील पाचव्या फेरीतील सामन्यांमध्ये कडवी लढत पहावयास मिळत असून पहिल्या पटावर रेल्वे अ संघाने विमानतळ प्राधिकरण संघाला चांगलेच झुंजवत सर्व पट अनिर्णीत राखण्यास यश मिळवले. अरविंदने दिपेन चक्रवती सोबत खेळताना कारो कान बचाव पद्धतीचा अवलंब केला पण दिपेन ने डावाच्या सुरवातीलाच एच ३ चाल खेळत अरविंद ला बुचकळ्यात पाडले, अरविंद ने आपले दोन्ही घोडे सी ४ व ब ६ वर मजबूत बसवल्यामूळे त्याच्याकडे डावाच्या मध्यभागी वरचष्मा होता पण दिपेन ने योग्य वेळी खेळलेल्या ए ४ प्यादाच्या चालीमुळे, मोहोऱ्यांची मारामारी करणे अरविंद ला क्रमप्राप्त झाले व लवकरच दोन्ही खेळाडूंनी बरोबरी स्वीकारली.
दुसऱ्या पटावर रेल्वे च्या ब संघाने तामिळनाडू संघाचा ३-१ ने पराभव करीत, पुढील फेरीसाठी पहिल्या पटावर कूच केले. तिसऱ्या पटावरील संघांमध्ये सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाच्या संघाने आक्रमक खेळ करीत महाराष्ट्र क संघाचा पराभव २.५- १.५ ने पराभव करीत ८ गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. पाचव्या फेरी अखेर विमानतळ प्राधिकरण व रेल्वे ब संघ ९ गुणांसह संयुक्त रित्या पहिल्या स्थानावर असून सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड व रेल्वे अ संघ ८ गुणांसह द्वितीय स्थानावर आहेत. सायंकाळच्या पुरुष गटांतील सहाव्या फेरीत अरविंद चिदंबरम चा विमानतळ प्राधिकरणाचा संघ रेल्वेच्या ब संघाबरोबर पहिल्या पटावर भिडणार असून, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड दुसऱ्या पटावर रेल्वे च्या अ संघाबरोबर भिडणार आहे.