जळगाव,दि. ११ – यावल, भुसावळ आणि जळगाव तालुक्यातील शेतकर्यांसाठी संजीवनी ठरणार्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम येत्या दिड महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती स्थानिक अभियंत्यांनी दिली असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी दिली. दरम्यान माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी रविवारी शेळगाव बॅरेज प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी स्थानिक अभियंत्यांशीही प्रकल्पाबाबत चर्चा केली. फेब्रूवारीमध्ये या बॅरेजला गेट बसविण्याचे काम करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम अंतीम टप्प्यात असून पुढील दिड महिन्यात ते पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती अभियंत्यांनी डॉ.पाटील यांना दिली. हे काम दिड महिन्यात पूर्ण झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात पाण्याची साठवण करता येणे शक्य होणार आहे.
तसेच यावल, भुसावळ आणि जळगाव तालुक्यातील शेतीचे क्षेत्र देखिल सिंचनाखाली येणार असल्याने हा प्रकल्प संजीवनी ठरणारा असल्याचे माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रवीण कोल्हे, शिवानंद बिरादर, गोपाळ भोळे व अधिकारी उपस्थित होते.