जळगाव, दि.२५ – एप्रिल, मे या महिन्यात झाडावरून बिया किंवा शेंग गळून पडत असतात व त्या वाया जातात. तसेच आपण फळ खाल्ल्यानंतर त्यामधील बिया फेकून देतो. या बिया संकलित केल्या व त्यांचे व्यवस्थित जतन केले तर या बियांपासून चांगल्या पद्धतीचे रोप निर्मिती करता येऊ शकते.एका बिजा मधून मोठे वृक्ष जन्माला येऊ शकते त्या वृक्षापासून सजीवसृष्टीला होणारे फायदे असंख्य आहेत.
एका बिजा मध्ये जंगल निर्मितीची ताकद असते. त्यामुळे या बिया वाया जाऊ न देता त्यांचे जतन करणे व त्यापासून रोप निर्मिती करणे किंवा या बिया जमिनीमध्ये व्यवस्थितपणे रुजविणे आवश्यक आहे. हा विचार मराठी प्रतिष्ठान तर्फे या वर्षी रुजविण्यात येत असून यासाठी बिया संकलन स्पर्धा सन २०२२ पासून दरवर्षी घेतली जाईल.
मराठी प्रतिष्ठान तर्फे जळगाव शहर स्तरीय बिया संकलन स्पर्धेची सुरुवात होत आहे. २५ मार्च ते ५ जून या कालावधीमध्ये संकलित होणाऱ्या बिया स्पर्धकांनी संस्थेकडे पाच जून नंतर जमा करावयाचे आहेत. ही स्पर्धा विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी खुली असणार आहे.
आपल्या स्थानिक परिसरामध्ये आढळणाऱ्या उपयुक्त झाडांच्या बिया योग्य पद्धतीने संकलित करून व्यवस्थित आवश्यक तेवढे सुकवून कागदी बॅगमध्ये स्वतंत्र रित्या पॅक करून मराठी प्रतिष्ठानच्या ११० नवी पेठ अथवा गणपती नगरातील देशपांडे मोटर ड्रायव्हिंग स्कूल, मराठी प्रतिष्ठानच्या कार्यालयात दि.१५ जून पूर्वी जमा कराव्यात. जमा केलेल्या बियांची संख्या, प्रकार त्यामधील उपयुक्त, औषधी, दुर्मिळ, जंगली अशा पद्धतीने वर्गीकरणानुसार प्रथम पाच स्पर्धकांची निवड विजेते म्हणून केली जाणार आहे.