मुक्ताईनगर | मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी ओझरखेडा धरणात तातडीने पाणी टाकावे. तसेच शेतकर्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी. या मागणीसाठी मंगळवारी तालुक्यातील ओझरखेडा धरणात उतरत आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले.
मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बाहेर निघणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. दरम्यान उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कडलग यांनी ओझरखेडा धरणावर धाव घेत, 15 दिवसात पाणी टाकण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. 15 दिवसात पाणी टाकण्यासंदर्भात उपाययोजना व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास शिवसेनेतर्फे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.