धरणगाव, दि. १५ – तालुक्यातील चोरगाव शिवारात बिबट्याने गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला आहे. सध्या या परिसरामध्ये शेतीची कामे सुरू असल्याने शेतात काम केल्याशिवाय मजुरांना पर्याय नाही. परंतु शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
सोमवारी चोरगाव येथे मंगल विठ्ठल सोनवणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासराचा फडशा बिबट्याने पाडला. यापूर्वी २७ जानेवारीला देखील दोन वासरे बिबट्याने फस्त केली होती. आव्हाणी येथे आठ दिवसांपूर्वी गुरांवर हल्ला केला होता. सतत घडत असलेल्या घटनांमुळे नदीकाठावरील चोरगाव, नंदगाव, देवगाव, फुकणी, नारणे, आव्हाणी, दोनगाव येथील ग्रामस्थ, शेतकरी भयभीत झालेले आहे. शेतकरी रात्री पिकांना पाणी द्यायला जाण्यासाठी जीव मुठीत धरून जात आहेत.
दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे यासाठी जि.प. सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार आज चोरगाव ते देवगाव-फुकणी रस्त्यावर पिंजरा लावण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई, चोरगाव सरपंच ज्ञानेश्वर सोनवणे, जंगु बापू सोनवणे, काशीनाथ सोनवणे, अनिल पवार, मच्छिद्र सोनवणे, मस्तान शाह आदी उपस्थित होते.
चोरगाव, देवगाव, फुकणी, नंदगाव, नारणे, आव्हाणी, दोनगाव परिसरात असलेला बिबट्याचा वावरामुळे माणसांना धोका होण्याची शक्यता असल्याने, वन अधिकाऱ्यांना सांगून बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असून लवकरात लवकर बिबट्या पकडला जाईल अशी आशा जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी व्यक्त केली.