जळगाव, दि. ०७ – पुस्तक भिशीतील पुस्तकं ही एकाच माणसाची नाही तर घराची झालीत. कुटुंबाची झालीत. हेच परिवर्तन पुस्तक भिशीचे यश आहे, असे विचार ज्येष्ठ कवयित्री व प्रकाशिका सुमती लांडे यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी कार्यक्रमात मत मांडले.
त्या पुढे म्हणाल्या की वाचन ही नितांत सुंदर गोष्ट आहे. वाचनाला कुठलंही सेन्सॉर लावू नये. जे हाती येईल ते वाचत जावे. वाचन म्हणजे आपला शोध असतो. प्रत्येक वाचनातून आपण तपासत जावे. पुस्तकं श्रीमंत करत असतात. आपण चित्र वाचावीत तर पुस्तकं, शब्द पहावीत, निरखून पाहावित, कारण प्रत्येक शब्दात खूप तळघरं असतात ती खणावी लागतात. पुस्तकांच्या या वेडापायी मी प्रकशिकाही झाले. जिथे जिथे मराठी वाचक आहेत त्या ठिकाणी मी पुस्तकं घेऊन गेले, याचा आनंद आहे. कारण पुस्तकं ही उद्याची वाट पहायला लावतात असे विचार त्यांनी मांडले.
याप्रसंगी विकास मलारा, विजय जैन, अंजली पाटील, नयना पाटकर, अश्विनी बाविस्कर या भाग्यवान वाचकांची निवड करण्यात आली. यावेळी जेष्ठ साहित्यिक एकनाथ पगार, शंभू पाटील आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर शेंडे यांनी पुस्तकं भिशी उपक्रमाविषयी तर मंजुषा भिडे यांनी परिचय करुन दिला. हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.