जामनेर, प्रतिनिधी : बचत गटाचे पैसे काढून बँकेबाहेर पडलेल्या ५० वर्षीय महिलेला बोलण्यात गुंतवून दोन भामट्यांनी नोटा बदलण्याच्या बहाण्याने १९ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास जामनेर येथील आयडीबीआय बँकेसमोर घडली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारती भगवान पाटील (वय ५०, रा. शहापूर, ता. जामनेर) या बचत गटाचे कामकाज पाहतात. गुरुवारी सकाळी त्या बचत गटाचे पैसे काढण्यासाठी जामनेर येथील आयडीबीआय बँकेत आल्या होत्या. बँकेतून रक्कम काढल्यानंतर त्या बाहेर पडल्या असता, ३० ते ३५ वयोगटातील दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना गाठले. यातील एका संशयिताने पांढऱ्या रंगाचा शर्ट व निळी जीन्स, तर दुसऱ्याने लाल रंगाचा शर्ट व काळसर पँट परिधान केली होती.

या दोघांनी भारती पाटील यांना बोलण्यात गुंतवले. त्यानंतर नोटा बदलून देण्याचे आमिष दाखवत अत्यंत चलाखीने त्यांच्याकडील १९ हजार ५०० रुपये लांबविले. काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भारती पाटील यांनी तत्काळ जामनेर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केला व तक्रार नोंदवली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.








