जळगाव, प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसोहळ्यादरम्यान झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम गोपाल धनगर (वय २३, मूळ रा. बोरनार, सध्या रा. अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रेम धनगर हा अमळनेर येथे वास्तव्यास होता, तर त्याचे आई-वडील बोरनार येथे राहतात. दोन दिवसांपूर्वीच प्रेम हा आपल्या गावी बोरनार येथे आला होता. बुधवारी सायंकाळी तो गावातील एका लग्नसोहळ्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याचे कोणाशीतरी जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन अज्ञात हल्लेखोराने प्रेम याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने प्रेम याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत प्रेम याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे नेमके कोण आहे आणि वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, याबाबत गावातील कोणीही माहिती देण्यास पुढे येत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मयत प्रेम धनगर याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
सदर तरुण प्रेम धनगर याच्यावर काही गुन्हे दाखल होते अशी माहिती मिळत आहे. तरुणाच्या अशा अचानक आणि निर्घृण हत्येमुळे धनगर कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.








