जळगाव, दि. ०४ – ‘शेतकरी ते ग्राहक उपक्रमांतर्गत ॲग्रोवर्ल्ड व कृषी विभाग (आत्मा) यांच्या संयुक्त उपक्रमामुळे नागरिकांना भेसळमुक्त व अस्सल इंद्रायणी तांदूळ आणि सेलम हळद उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोचत असून ही संकल्पना अतिशय स्तुत्य आहे. यामध्ये कोणी मध्यस्थ नसल्याने शेतकऱ्यांनाही बाजारभावापेक्षा दोन पैसे जास्त मिळत आहेत. त्यामुळे “शेतकरी ते ग्राहक” या उपक्रमांतर्गत इंद्रायणी तांदूळ व सेलम हळद महोत्सवाचा जळगावातील नागरिकांनी आवर्जुन लाभ घ्यावा’, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
ॲग्रोवर्ल्ड व कृषी विभाग (आत्मा) मार्फत ‘शेतकरी ते ग्राहक’ उपक्रमांतर्गत शहरातील काव्यरत्नावली चौकात आयोजित इंद्रायणी तांदूळ व सेलम हळद महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नगरसेवक अनंत जोशी, नगरसेवक नितीन बरडे, पोखराचे प्रकल्प उपसंचालक संजय पवार, ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण आदी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. महोत्सव काव्यरत्नावली चौकात सोमवार (दि. ०७ फेब्रुवारी) पर्यंत सुरू असून सकाळी १० ते रात्री ०८ वाजेपर्यंत सुरू असेल.
पालकमंत्र्यांनी स्वतः केली तांदूळ व हळदीची खरेदी..
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः इंद्रायणी तांदूळ व सेलम हळदीचे चार कट्टे विकत घेतले. असा उपक्रम ॲग्रोवर्ल्डने मागील वर्षी देखील राबवला होता. त्यावेळी मी एक कट्टा तांदूळ व हळद खरेदी केली होती. इंद्रायणी तांदूळ अतिशय चविष्ठ असून पचनाला हलका आहे. तर सेलम हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ४ ते ४.५% असल्याने ती आरोग्यवर्धक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.