जळगाव, प्रतिनिधी : कानळदा रोडवरील फुपनगरी फाट्याजवळ भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पाळधी येथील २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सागर सुनील कोळी असे मृत तरुणाचे नाव असून, बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हा अपघात घडला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे फुपनगरी फाट्यावरील अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सागर कोळी हा पाळधी (ता. धरणगाव) येथील रहिवासी होता. रात्री काम आटोपून तो दुचाकीने (एमएच १९ ईएम ६१८५) आपल्या गावी परतत होता. कानळदा रोडवरील फुपनगरी फाट्याजवळून जात असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सागरचा मृत्यू झाला.

अपघातानंतर संबंधित वाहनचालक जखमी तरुणाला मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सागरला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले; मात्र या अपघातात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नवल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे तपास करीत आहेत.
कानळदा रोडवरील फुपनगरी फाट्याजवळील धोकादायक वळण अपघातांचे केंद्र बनत चालले आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेच्या दोन दिवस आधी, १८ ऑक्टोबर रोजी रात्रीही याच परिसरात अपघात झाला होता. त्या वेळी सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती.
मात्र, गेल्या वर्षी याच वळणावर झालेल्या अपघातात दोन तरुणांना प्राण गमवावे लागले होते. गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी सात ते आठ भीषण अपघात झाले असून, त्यामध्ये चार जणांचा मृत्यू, तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. धोकादायक वळणावर योग्य दिशादर्शक फलक, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे.









