जळगाव, प्रतिनिधी : नशा करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून तीन ते चार जणांनी एका भंगार व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास खेडी गावाजवळ घडली. या हल्ल्यात किशोर मधुकर बाविस्कर (वय ४५) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

किशोर बाविस्कर हे खेडी येथील शिवनगर परिसरात राहतात. भंगार विक्रीच्या व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२२ ऑक्टोबर) सायंकाळी आनंद पाटील, गौरव पाटील, सनी (पूर्ण नाव समजू शकलेले नाही) आणि अन्य एका व्यक्तीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, बाविस्कर यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादातून रात्री उशिरा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी सकाळी संशयितांनी पुन्हा बाविस्कर यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचे सांगण्यात येते. त्यांनी पुन्हा नकार दिल्यानंतर वाद वाढला. त्यातून संतप्त झालेल्या संशयितांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात बाविस्कर यांच्या कमरेवर, पाठीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या.
हल्ल्याची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी घटनास्थळी धाव घेत जखमी बाविस्कर यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे समजते.
या घटनेप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्ल्यातील संशयितांची भूमिका आणि घटनेमागील नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. खेडी गावाजवळ घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.









