जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील शिरसोली प्र. बो. आणि चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी व मुंदखेडा बुद्रुक येथे गळफास घेतल्याच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिरसोली येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा गळफास घेतल्याने मृत्यू

शिरसोली प्र. बो. येथील अनिल नामदेव फुसे (वय ४२) यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.

चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी येथील शिवाजी शेनपडू अहिरे (वय ३८) यांनीही गळफास घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला. १६ ऑक्टोबर रोजी त्यांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाळ पाटील करीत आहेत.
दरम्यान, मुंदखेडा बुद्रुक येथील संदीप कैलास पाटील (वय २५) यांचाही गळफास घेतल्याने मृत्यू झाला. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृतावस्थेत दाखल करण्यात आले. या प्रकरणीही अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप माने तपास करीत आहेत.








