जळगाव (प्रतिनिधी): ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना उद्योजकतेची दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महिलांमधील उपजत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत बचत गटांच्या माध्यमातून स्वयंरोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने आदिवासी महिला बचत गटांचा भव्य मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला.
वीरांगना राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन सभागृहात हा मेळावा पार पडला. परिसरातील शेकडो आदिवासी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मेळाव्याला मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. १ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत स्थापन झालेल्या प्रत्येक महिला बचत गटांना १० हजार रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण करुन प्रमाणपत्रांचेही यावेळी वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, आदिवासी विकास विभाग नाशिकचे उपआयुक्त राजेंद्र हिवाळे, उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनीलकुमार दोहरे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक ललित तावडे यांच्यासह बचत गटांच्या प्रतिनिधी, महिला लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*महिलांनी बचतीपलीकडे उद्योगाकडे वळावे*
आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, कुटुंब आणि समाजाच्या सर्वांगीण विकासात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आदिवासी भागातील महिला बचत गटांनी केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता उत्पादन, प्रक्रिया उद्योग तसेच विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी शासन कटिबद्ध असून, विविध कल्याणकारी योजना व अनुदानाचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी महिला बचत गटांची कार्यपद्धती, अंतर्गत कर्जवाटप, हिशेब नोंदणी, व्यवस्थापन तसेच ‘उमेद’ अभियानांतर्गत उपलब्ध विविध संधींची माहिती दिली. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुनीलकुमार दोहरे यांनी बँक लिंकेज, फिरता निधी, सवलतीच्या दरातील कर्जपुरवठा आणि डिजिटल बँकिंग व्यवहारांची माहिती दिली. प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी प्रास्ताविकात आदिवासी विकास विभागामार्फत महिला व बचत गटांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक आणि सामूहिक योजनांची माहिती दिली.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत ‘सुंदर शाळा अभियान’मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहांना पुरस्काराने गौरविण्यात आले. शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील इयत्ता दहावी व बारावीतील कला व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना ‘राघोजी भांगरे गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
********












