जळगाव प्रतिनिधी

गणेशोत्सवादरम्यान गुलाल अंगावर टाकल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणासह त्याच्या भावाला तिघांनी मारहाण करून दगडफेक केल्याची घटना शहरातील सबजेलच्या मागील बाजूस असलेल्या गणेशनगर परिसरात घडली. या दगडफेकीत दोघे भाऊ जखमी झाले असून, नातेवाईकांच्या चारचाकी वाहनाचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओम रविंद्र सोनवणे (वय २०, रा. कलाभवन, नेहते कॉम्प्लेक्स) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. ओम हे १४ सप्टेंबर रोजी रात्री त्यांचा भाऊ शुभम सोनवणे याच्यासोबत सबजेलच्या मागील बाजूस राहणाऱ्या आत्याकडे जेवणासाठी गेले होते.

जेवण आटोपून दोघे भाऊ रात्री साडेअकराच्या सुमारास घरी परतत असताना त्यांच्या परिचयातील विक्की बाविस्कर, सनी बाविस्कर आणि आणखी एक जण रस्त्यावर गुलाल उधळत होते. यावेळी त्यांनी शुभम सोनवणे यांच्या अंगावर गुलाल टाकला.
याचा जाब विचारण्यासाठी ओम सोनवणे त्यांच्याकडे गेले असता तिघांनी ओम आणि शुभम या दोघा भावांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिघांनी रस्त्यावर पडलेले दगड उचलून दोघांच्या दिशेने फेकले. यावेळी तिघांपैकी एकाने शुभम यांच्या कमरेवर लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने ते जखमी झाले.
दरम्यान, आरोपींकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत ओम सोनवणे यांच्या नातेवाईकांच्या चारचाकी वाहनाचेही नुकसान झाले. वाहनाची तोडफोड झाल्याने नुकसान झाले आहे.
या घटनेप्रकरणी ओम रविंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून विक्की बाविस्कर, सनी बाविस्कर आणि त्यांच्या अन्य एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.









