जळगाव, प्रतिनिधी : त्रिवेणी समूहातर्फे महिलांसाठी ‘श्रावण सरी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत हतनूर हॉल, महाबळ, जळगाव येथे करण्यात आले आहे.

महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्या सामाजिक व व्यावसायिक योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना आपल्या उत्पादनांची माहिती व प्रसार करण्यासाठी विविध स्टॉल्सच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे महिला उद्योजिकांना आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.

कार्यक्रमात महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक लकी ड्रॉ आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक सहभागी महिलेसाठी रिटर्न गिफ्ट देण्यात येणार असून, आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणाऱ्या महिलांसाठी विशेष बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘श्रावण सरी’चा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांतर्फे सुरेखा पवार, शुभांगी पाटील, वैशाली बोंडे यांनी केले आहे.








