जळगाव प्रतिनिधी शहरातील स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या संशयास्पद आणि अनैतिक प्रकारांवर अखेर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. रिंगरोडच्या सुरुवातीला असलेल्या आरसी टॉवरमधील ‘स्पा ९९’ वर दामिनी पथक आणि मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने संयुक्त कारवाई करत छापेमारी केली. या कारवाईत स्पा सेंटरमधून सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटरचा मालक व जागामालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या या अचानक झालेल्या धडक कारवाईमुळे शहरातील इतर स्पा चालक आणि दलालांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, संबंधित आस्थापनात मसाज आणि स्पा सेवेच्या नावाखाली व्यावसायिक लैंगिक व्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (पीटा ॲक्ट) अंतर्गत गुन्हा क्र. २७६/२०२६ नोंदवत आरसी टॉवरमधील ‘स्पा ९९’ वर छापा टाकला. या छाप्यात २६ ते ३७ वर्षे वयोगटातील सहा महिलांची सुटका करण्यात आली.

या महिलांमध्ये पश्चिम बंगाल, मणिपूर, सिक्कीम आणि बांके (नेपाळ) येथील तरुणींचा समावेश असून त्या थेरपिस्ट म्हणून काम करत होत्या. नेपाळी महिलेच्या पासपोर्ट, व्हिसा आणि वास्तव्याच्या वैध कागदपत्रांची पोलीस सध्या सखोल तपासणी करत आहेत.
या प्रकरणात स्पा मालक नीरजसिंग पंड्या आणि जागेचे मालक राजेंद्र पुंडलिकराव चव्हाण यांच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैरप्रकारासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि अनैतिक व्यवसायाला खतपाणी घालणे याप्रकरणी दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
शहरातील इतर स्पा सेंटर्सचीही नियमित तपासणी करून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
*********








