जामनेर | प्रतिनिधी : जामनेर शहरातील मनाली इस्टेट परिसरात असलेल्या गॅस एजन्सीच्या गोदामातून अज्ञात चोरट्यांनी घरगुती वापराचे तब्बल १० गॅस सिलिंडर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरी झालेल्या सिलिंडरची एकूण किंमत सुमारे ३३ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगदीश प्रल्हाद पाटील (वय ६१, व्यवसाय-गॅस, रा. मनाली इस्टेट, जामनेर) यांच्या सिद्धेश इंडेन ग्रामीण वितरक एजन्सीच्या गोदामात भारत गॅस कंपनीचे लाल रंगाचे घरगुती वापराचे सिलिंडर ठेवण्यात आले होते.

या गोदामाला लावलेले कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडले. त्यानंतर आत प्रवेश करून १४ किलो वजनाचे भरलेले १० सिलिंडर चोरून नेले.२३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून २४ ऑगस्ट रोजी सकाळी ८.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. गोदामाची पाहणी केल्यानंतर सिलिंडर गायब असल्याचे निदर्शनास आले.

चोरीला गेलेल्या १० घरगुती गॅस सिलिंडरची एकूण किंमत ३३ हजार रुपये असल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास सफौ/६२६ सुनील जोशी करीत आहेत. पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.








