जामनेर, (प्रतिनिधी) : येथील मदनी नगर भागातील बंद घराचे कुलूप तोडून ९ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लांबवणाऱ्या ३ चोरट्यांना जामनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. फिर्यादी मसुद अक्तार मुजफर हुसेन हे बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली होती.
याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे संशयित शेख समिर उर्फ बाल्या शेख जाकीर (वय २४, रा. जामनेर) याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून त्याचे साथीदार मोहमद फातिर उर्फ गोलु मिया तुफेल मोहमद (वय २०, रा. जामनेर) आणि शेख अमिर शेख जाकीर (वय १९, रा. जामनेर, सध्या रा. नाशिक) यांनाही अटक करण्यात आली.
आरोपींकडून ३०.०१ ग्रॅम सोने, १२ भार चांदी, ३ मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक नखाते, डीवायएसपी बापु रोहम, पीआय मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अशोक कोकाटे, पोलिस कर्मचारी सचिन महाजन, ज्ञानेश्वर देशमुख, सुशील सत्रे व सहकाऱ्यांनी केली.








