जळगाव, (प्रतिनिधी) : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला एलपीजी इंधनाचा तुटवडा आणि त्याचा गैरफायदा घेऊन सुरू असलेली चढ्या दराने विक्री, तसेच महाराष्ट्र शासनाकडून कल्याणकारी मंडळाच्या नावे होणारी सक्तीची वसुली या विरोधात जळगाव जिल्ह्यातील रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. ‘ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती’च्या वतीने बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनामागची प्रमुख कारणे:
▪️इंधन दरवाढ व काळाबाजार: शहरातील एलपीजी गॅस वितरक प्रति लिटर ११० ते १५० रुपये या चढ्या दराने विक्री करत असून, रिक्षाचालकांना आर्थिक फटका बसत आहे. ५५ रुपये दराने गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने केली आहे.
▪️सक्तीची नोंदणी फी: कल्याणकारी मंडळाच्या सदस्य नोंदणीसाठी ८०० रुपये (५०० रुपये नोंदणी + ३०० रुपये वार्षिक वर्गणी) सक्तीने वसूल केले जात आहेत. ही फी रद्द होईपर्यंत रिक्षाचालक सदस्य होणार नाहीत, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
▪️कामात अडवणूक: नोंदणी केली नाही म्हणून रिक्षा पासिंग आणि परवाना नूतनीकरणाची कामे थांबवण्यात आली आहेत, त्याबाबत चालकांमध्ये तीव्र संताप आहे.
प्रदेशाध्यक्ष शशांक राव आणि महासचिव विलास भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटना, पदाधिकारी आणि चालकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी केले आहे.








