जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असतानाच, जिल्हापेठ पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तपास चक्र फिरवून दोन सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीची एक होंडा ड्रीम मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. जळगाव नवीन बसस्थानक परिसरातून एक मोटारसायकल चोरीला गेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये २० जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयित आरोपी आकाश राजू खरे (रा. नांद्रा ता. पाचोरा, ह.मु. पिंप्राळा हुडको, जळगाव) आणि आकाश प्रकाश भिल (रा. कासमपुरा, ता. पाचोरा) या दोघांना ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता, आरोपींनी जळगाव शहरातील भाजे गल्ली येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीची होंडा कंपनीची ‘ड्रिम’ मोटारसायकल (एम एच १९ डीए ५०११) जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार महेंद्र पाटील करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख, पोलीस कर्मचारी महेश महाजन, महेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे, तुषार पाटील, विशाल साळुंखे, गोविंद साबळे आणि जयेश मोरे यांचा सहभाग होता.







